सोमवार, २ जुलै, २०१२

हे किडे कशासाठी ?

२२ वर्ष नौकरी केली. वडीलांच्या आकस्मित निधनानं पोरक्या झालेल्या शेतीला आधार देण्यासाठी नौकरी सोडायचा निर्णय घेतला. मोठ्या हौसेने प्रोडक्शन म्यानेजर या मोठ्या पदावरची एका बहु देशीय  कंपनीतली नौकरी सोडून शेती करायला गेलो. वडील गेल्यानंतर ऑक्टोबर २०१० ला चार एकर उस लावला होता. डिसेंबर २०११ ला नौकरी सोडून कायमचा शेतावर गेलो. नव्यानं दीड उस एकर लावला. दीड एकर भुईमुग पेरला. एकरभर भेंडी लावली. आणि
पावसानं प्राण कंठाशी यावेत इतपर ओढ दिली. आटत्या पाण्याचा उसाला फटका बसत होता. भुईमुग पाण्यावाचून सुकू लागला होता. भेंडीला वेगवगळ्या रोगांनी पछाडलं. एकूण काय पावसाचं मळभ दाटण्या  एवजी माझ्या चोहीबाजुने असं संकटांच मळभ दाटून आलं. हवालदिल होऊन आभाळाकडे पाहत राहिलो.

भेंडीवरचा रोग खूप भयंकर होता. भेंडी चार श पानांवर आली होती. सगळ्या पानांना भोका पडू लागली होती. आम्हाला अनुभव नव्हताच. पण मी ज्याच्या कडून बी आणि इतर गोष्टी घेतो तो विशाल शिंदे गावातलाच. B .Sc. agri झालेला. शेतीची शास्त्रीय माहिती असलेला. भेंडीचा बी घेतानाच त्याला सांगितला होतं तू लक्ष देणार असशील तरच भेंडी करतो.  भेंडीच्या पानांना भोका पडू लागली तेव्हा त्याला बोलावलं. त्यानं कीटक नाशकाची फवारणी करायला सांगितली.
फवारणी केली आणि नव्यानं येणाऱ्या पानांवर तो रोग पडला नाही. नवी पानं नव्या तेजानं उगवली. भेंडी आता अधिक चांगली झाली होती. पाऊस नव्हता. विहिरीचं पाणी कमी झालं होतं. पण भेंडीला प्राधान्यानं पाणी देत होतं. भेंडीला फुलं लागली होती. आठ एक दिवसात भेंडी मार्केटला जाईल अशी आशा होती. आणि अचानक भेंडी सुकू लागली. पुन्हा विशालला बोलावलं. तो म्हणाला तुडतुडे झालेत आणि मावा पडलाय. फवारणी करावी लागेल. फवारणी घेतली पण रोग हटेना. पुन्हा त्याला बोलावलं. आम्ही भेंडी निरखून पहिली. पानांवर खूप तुडतुडे होते.

तुडतुडे म्हणजे. बारीक कीटक. नखाच्या कपचीत बसतील एवढूसे. मच्छरांपेक्षाही खूप लहान. हिरवेगार. एकाच पानांवर शंभर ते दीडशे किडे. पानांच्या मागील बाजूने बसलेले. विशाल सांगत होता, " हे किडे पानांमधला रस शोषून घेतात. म्हणून झाडा अशी सुकून जातात. आणखी एका वेगळी फवारणी घेवू या. चांगला पाऊस झालं असता तर हे असले सगळे रोग धुऊन गेले असते." तीही फवारणी घेतली पण काही फरक पडेना. सुनील पवार म्हणून आणखी एकजण आला. म्हणाला, " साहेब, एक काम करा. रोगटलेली सगळी पानं कापून काढा. पुन्हा फवारणी घ्या."

शंभर रुपयांच्या कात्र्या आणल्या. पानं कापताना बोटं दुखू लागली. पण ते काम पूर्ण केला. गड्याला फवारणी घ्यायला सांगितली. आणि पुण्याला आलो. काल गद्याचा फोन आला, " भेंडी खूप सुधरली नाही पण तोडायला आलीय. एक दोन प्ल्यास्टिकचे क्यारेत ( अंदाजे तीस एक किलो) भरतील. तुम्ही कधी येताय."
आज त्याला भेंडी तोडायला सांगितली. आणि मी पुण्यातून गावी निघालोय. उद्या भेंडी बाजारात न्यावी लागेल.

मला हे सगळं सांगायचं नाही. मला सांगायचं ते एवढंच. हे सारा पहात असताना मला प्रश्न पडला कि या किड्यांची निर्मिती देवानं कशासाठी केली असेल? असं पणन मधला रस शोषून घ्यायचा आणि शेतकऱ्याला गोत्यात आणायचं एवढंच का कार्य असेल त्यांचं. मी सांगतो खचितच नाही.

इतर झाडावर हे किडे कसे नसतात ? भेंडीवरच ते कुठून येतात ? मी इथं भेंडी लावलीय हे त्यांना कसं कळलं ? शेतकरी पानाच्या वरून औषध मारतो तेव्हा आपण पानांच्या खालून बसावं हे ज्ञान त्यांना कुठून आलं.? आपण आल्याला खूप बुद्धी आहे असं समजतो तर आपल्यावर कुरघोडी करणाऱ्या या जीवांची बुद्धी किती तल्लख असेल ? त्यांची योजना परमेश्वरानं कशासाठी केली असावी हे आपल्याला कळत नाही. आपला विज्ञान एवढ प्रगत नाही. चंद्रावर जाण्यापेक्षा या असल्या संशोधनाची खूप गरज आहे.     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा