मंगळवार, ३१ जुलै, २०१२

मी कुणाचा दास नाही

( हि मराठी कविता एका खूप उद्विग्न मनस्थितीत लिहिली आहे. ज्वालामुखीतून उफाळणारा लाव्हा बाहेर पडावा, तशी एका वास्तव प्रसंगी हि कविता आकाराला आली आहे. म्हणुनच ......

ते विषाचा घागरी
मी अमृताचा गडवा

किंवा

पेरतो मी सदगुणांना
भोवतीने भोवताली ............

या सारख्या ओळी वाचून. हा काय स्वतःला फार सदगुणी समजतो काय ? असा सूर कुणीही काढू नये. माझी मनस्थिती समजावून घ्यावी.  दुर्गुण माझ्यातही आहेत. पण


मी माझ्या स्वार्थासाठी कुणालाही टाचेखाली चिरडू इच्छित नाही एवढ मात्र खरं. )

तर...................

प्रत्येकालाच असं वाटत कि मी दुसऱ्यावर फार उपकार करतो आहे. पण खरंच तसं काही नसतं. कुणी कुणावर उपकार नाही करत. त्या नियतीनं आपल्याला काही चांगली कर्म करण्यासाठी या भूतलावर पाठवलंय. पण आपण मात्र आपल्या प्रत्येक कर्माला स्वार्थाच्या दोरखंडांनी जाम जखडून टाकलंय. आपल्या स्वार्थासाठी आपण अनेकांना आपल्या टाचेखाली चिरडू पाहतो. आणि वरून पुन्हा, " तू माझ्या टाचेखाली आहेस म्हणून शाबूत आहेस असा आव आणतो." स्वतःचं हित साधताना खरंतर आपण आपल्याही नकळत दुसऱ्याचा रक्त पित असतो. फक्त ते कुणाला दिसत नाही.

आमचे एक साहेब आहेत. त्यांना कायम असं वाटतं कि त्यांनी म्हणून आम्हा सगळ्यांना सांभाळून घेतलं आहे. नाहीतर आम्हाला दोन वेळचं अन्नही मिळणं मुश्कील झालं असतं. ते सगळ्यांनाच वाट्टेल तसे भरडू पहातात. काय साधतात त्यातून कुणास ठाऊक. कदाचित मी कसा कुणालाही माझ्या टाचेखाली चिरडून टाकू शकतो हे त्यांना इतरांना दाखून द्यायचं असावं. आणि त्यातून मिळणाऱ्या एका मानसिक अघोरी सुखात ते न्हाऊन निघत असावेत. पण दुसऱ्याला असं चिरडून टाकण्यात आणि मानसिक क्लेश देण्यात कसलं आलंय समाधान ?

' ज्यानं चोच दिली तोच दाणाही देतो.'  हेच जर खरं असेल तर मग आपण का उगाच स्वतःची टिमकी वाजवतो.
तळहाता एवढ्या रानात चिमुटभर पेरला कि जे उगवता तेच पोटाला लागता. तो घास कोण कुणाला देतो. ती काळी आई तिच्या कुशीतून पिकावते आणि आपल्या मुखात घालते. आभाळातून मेघ बरसतो आणि प्रत्येक सजीवाला पाणी मिळतं. आयुष्य चालतंय ते त्या दोन घासावर आणि घोटभर पाण्यावर. त्यावर का कुणी आपला हक्क सांगावा ? या विचारातूनच -

ओंजाळीचे रान माझे
चिमटीचा पेर होता
घेतलेला घास माझा
फक्त माझा शेर होता

या ओळींनी जन्म घेतला.  पण माणसं मात्र नेहमीच दुसऱ्यावर खूप उपकार करत असल्याचा आव आणतात. आणि इतरांना स्वतःचे अगदी गुलाम समजतात.

म्हणूनच -

' मी कुणाचा दास नाही
ना कुणाचा बडवा.'

अशा ओळी माझ्या हातून कागदावर उतरल्या. कारण आजकाल जो हुजरेगिरी करेल.........जो दुसऱ्याची तळी उचलून धरेल.......जो दुसऱ्याच लांगुलचालन करेल.......... जो दुसऱ्याची थुंकी झेलण्याची तयारी ठेवेल तोच मोठा होईल असं काळ आलाय.

पण हे खरं नाही मित्रांनो, हे खरं असतं तर शिवरायांच्या चरणी तुकोबारायांनीच नसतं का माथा टेकला ?


कविता, मराठी कविता

कविता, मराठी कविता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा