मंगळवार, ३१ जुलै, २०१२

खरंच का गगन ठेंगणे ?

काल काही वर्तमान पत्रात हेड लाईन वाचली - " भारताला गगन ठेंगणे ".

तेव्हा मला पडलेला हा प्रश्न -  खरंच का गगन ठेंगणे ?

गगन नारंग. २०१२ च्या ऑलंपिक मध्ये भारताचं नाव पदक तक्त्यात आणणारा पहिला खेळाडू. एक जिगरबाज नेमबाज. अपेक्षेनुसार कामगिरी साधणारा एक हरहुन्नरी. त्यानं पदक मिळवलं आणि लगेच हरियाना सरकारनं त्याला एक कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. सरकारी तिजोरीतून कुणा एका व्यक्तीला पैश्याच्या स्वरुपात अशा रीतीने बक्षीस देणं योग्य आहे ?
पैसे जनतेचे.......आणि वाटणारे आणि श्रेय घेणारे आमचे पुढारी. खरंतर कोणत्याही शासनानं अशा प्रकारची खिरापत वाटताना जनतेची परवानगी घ्यायला हवी. मोबाईल आणि कॉम्प्युटर यासारख्या माध्यमांच्या सहायाने ते सहज शक्यही आहे. गरज आहे ती शासकीय यंत्रणेच्या इच्छाशक्तीची.

गगनला सुवर्ण पदक मिळणं शक्य नव्हतं. त्याची झेप
कांस्यपदका पर्यंतचीच होती. त्याच्या मागील कामगिरीवरून ते सहज लक्षात येतं.

गगनला पदक मिळालं याचा आनंद मलाही आहे. पण १०० हून अधिक सदस्यांचा पथक ऑलंपिकला पाठविण्यासाठी २५० कोटीहून अधिक खर्च आला आहे. आणि पाचहून अधिक पदकं आमच्या पदरी पडणार नाहीत हि वस्तुस्थिती आहे. मग हा सारा खटाटोप कशासाठी ?
 

केवळ ३१ कोटी लोकसंख्या असणारी अमेरिका आताच २३ हून अधिक पदक खिशात घालून बसलीय.
 

१३४ कोटी लोकसंख्या असलेला चीन आपण एक न एक दिवस महासत्ता होणार हे दाखवून देतोय आणि अमेरिकेपेक्षा अधिक सुवर्ण पदकं खिशात घालून पदक तक्त्यात सर्वात वरचं स्थान मिळवतोय.
 

आणि १२२ कोटी लोकसंख्या असणाऱ्या भारतानं एक पदक मिळवलं तर आम्ही आनंद उत्सव साजरा करतोय.
 

व्वा ! काय कामगिरी आहे आमच्या देशाची.
 

गगनच्या यशाचं कौतुक मला नक्कीच आहे. पण आमच्या देशाची ऑलंपिक मधली एकूण कामगिरी अत्यंत निराशजनक आहे याचं वाईट वाटतंय.
 

या अपयशाला आमची मानसिकता कारणीभूत आहेच पण आमच्या देशातलं सडलेलं राजकारण हे या यशाला अधिक कारणीभूत आहे. याची जाणीव आमच्या पुढाऱ्यांना नक्कीच असावी. आणि म्हणूनच आपल्या देशाच्या ऑलंपिक मधल्या एकूण अपयशाचा मूल्यमापन न करता त्या बाबत एक चकार शब्द न बोलता आमचे पुढारी पदक मिळवणाऱ्या एकट्या दुकट्या खेळाडूवर स्तुती सुमनांचा वर्षाव करतात.
 

गगन तुझ्या यशाबद्दल तुझं मनपूर्वक अभिनंदन. पण आपल्या एकूण अपयशाकडेही डोळेझाक करून चालणार नाही.     

Gagan Sarang




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा