शुक्रवार, २९ जून, २०१२

पाटी तेवढी खरी वाटते.

मुलांना सुट्टी खूप हवीशी वाटते. पण ‘ अती केलं, माती झालं ‘ या न्यायानं मुलांनाही या सुट्टीचा कंटाळा येतो. शाळा हवीशी वाटू लागते. नवा गणवेष……….नवा ड्रेस……….. नवा बूट………नवे मोजे…………नवं दफ्तर………. नवी पुस्तकं………..नव्या वह्या………..साहजिकच सुट्टीचा कंटाळा येऊन शाळेची ओढ वाटू लागते. या कवितेतल्या मुलाला तरी सुट्टीचा खरंच कंटाळा आला म्हणून तो म्हणतोय -






पाटी तेवढी खरी वाटते.
  *****************
खूप केली दंगा मस्ती
परी राज्यात फिरून आलो
खूप खेळलो पत्ते, कधी -
राजा, राणी, गुलाम झालो.

       गावालाही जावून आलो
       नवी मामी पाहून आलो
       चिंच बोरे खाता खाता
       झाडावरचा मिठू झालो.
 
आता झाली सुट्टी पुरे
शाळा मला खरी वाटते
टि. व्ही. नको गेम नको
पाटी तेवढी खरी वाटते

        शाळेमध्ये तशी आई
        खूप खूप मजा येते
        मधली सुटी रोज नवे
        आनंदाचे गाणे गाते.

लंगडी – पाणी , अप्पा – धप्पी
हयाची भाजी त्याची पोळी
वर्गात गेल्यावर मग मात्र
आळी मीळी गुप चीळी.


लक्षात ठेवाल ना मुलांनो !  वर्गात गेल्यावर आळी…… मीळी………….गुप…………….चीळी म्हणून  एकदम गप्पं बसायचं आणि मन लावून आभ्यास करायचा.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा